सामाजिकजळगांव

गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – मंत्री गुलाबराव पाटील

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा

खान्देश टाइम्स न्यूज l सप्टेंबर २०२४ l स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज येथील संत एकनाथ रंगमंदिरात पार पडला. सन २०१८-१९, २०२९-२०, २०२०-२१, २०२१-२२ अशा एकत्रित स्पर्धांचे आज पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे होते. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक ई. रविंद्रन, अतिरिक्त संचालक शेखर रौंदळ, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते.

आपल्या संबोधनात मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाला मिळणारा पुरस्कार हा गावाचे वैभव असतो. आपलं गाव स्वच्छ असावं असे तरुणांना वाटते हे या अभियानाचे यश आहे. गाव स्वच्छ तर मन स्वच्छ. सर्व गावाने मिळून एकोप्याने काम केलं तर नक्कीच गावाची प्रगती होऊ शकते. त्यासाठी गावकऱ्यांनीही आपले सर्व कर नियमित भरणे आवश्यक असते. तसे केले तरच ग्रामपंचायतीकडून लोकांना सेवा दिली जाऊ शकते. ही स्पर्धा तांड्या- वाड्यांपर्यंत नेण्यासाठी तसेच स्पर्धेतील पारितोषिकाची रक्कम वाढविणे ही बाबही शासनाच्या विचाराधीन आहे, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, स्पर्धा निर्माण करुन गावांचा विकास करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यात सर्व गावाने एकोप्याने सहभागी होणे आवश्यक आहे. प्रास्ताविक अभियान संचालक ई रविंद्रन यांनी केले. अभियानाबाबत विभागाची भुमिका प्रधान सचिव संजय खंदारे यांनी मांडली. विजय कदम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला राज्यभरातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button