सामाजिकजळगांव

सफाई कर्मचारी हेच त्या-त्या गावाचे खरे नायक; पाळधी येथे “स्वच्छता ही सेवा” अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

खान्देश टाइम्स न्यूज l धरणगाव l आरोग्याचा खरा मंत्र स्वच्छता असून “ स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ” ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामुहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत असून ही बाब शासनासाठी उत्साहवर्धक आहे. स्वच्छता ही केवळ गरजच नाही तर ती एक सवय झाली पाहिजे. बाह्य स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता झाली पाहिजे. यासाठी मन आणि गाव दोन्ही स्वच्छ ठेवा. प्रत्येकाने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी. स्वच्छता करणारे प्रत्येक सफाई कर्मचारी हेच त्या – त्या गावाचे खरे नायक असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम यासाठी भाऊसो गुलाबारावजी पाटील शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम प्रमाणे देशभरात मोठ्या उत्साहात राबविले जात आहे. स्वच्छता अभियान केवळ 2 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

‘करूया वाईट विचार नष्ट – स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’

“स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ कार्यक्रम प्रसंगी स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 3 या प्रमाणे 45 सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छ्ता मित्र’ म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बुके देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘करूया वाईट विचार नष्ट – स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ बाबत सर्वांना स्वच्छते बाबत तसेच प्लास्टिक व थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध बाबत सामुहिक शपथ देण्यात आली व सतत स्वच्छता टिकविण्यासाठी संकल्प करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. दि.17 सप्टेंबर 2024 ते दि. 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची “ स्वच्छता ही सेवा “ मोहिमेत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित केली आहे. अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग नोंदवून गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम टिकविण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेवून जनजागृती करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” बाबत सविस्तर माहिती विशद करून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन स्वच्छता तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले. तर आभार सहायक गट विकास अधिकारी कैलास पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पाळधी बु. आणि खु. ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी केले होते.

यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे समन्वयक डॉ. सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, सरपंच विजय पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक , उपसरपंच दशरथ धनगर, शरद कोळी, प्रा. आ. केंद्राचे डॉ. चेतन अग्निहोत्री, ग्रामपंचायत सदस्य कैलास इंगळे, मच्छिंद्र साळुंखे, राहुल धनगर, निसार शेख, रामचंद्र सोमाणी, शेख मलिक, गणेश माळी, दयानंद कोळी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , स्वच्छता विभागाचे पी. आर. सी./सी.आर.पी., जिल्ह्यातील स्वच्छता मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button