यावल : माहेरून 15 लाख रुपये आणावे म्हणून तालुक्यातील साकळी या गावातील माहेर असलेल्या विवाहितेचा पतीसह सहा जणांनी छळ केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
साकळी, ता.यावल येथील माहेर असलेल्या स्नेहा शोबन बडगुजर वय 30 या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह 26 फेब्रुवारी 2017 रोजी नेरूळ, मुंबई येथील शोबन वासुदेव बडगुजर या तरुणासोबत झाला. विवाहानंतर सासरच्या लोकांनी लग्न आपल्या स्टेटसप्रमाणे केले नाही. याचा राग बोलून दाखवला व विवाहितेचा छळ करू लागले व विवाहितेने माहेरहून 15 लाख रुपये आणावे म्हणून तिचा पती शोबन वासुदेव बडगुजर, सासरे वासुदेव लक्ष्मण बडगुजर, सरीता वासुदेव बडगुजर, जतीन वासुदेव बडगुजर (तिघे राहणार नेरूळ, मुंबई), अविनाश लक्ष्मण बडगुजर (रा.धुळे) व प्रदीप रघुनाथ बडगुजर (पिंपळगाव हरेश्वर) या सहा जणांनी तिचा छळ करायला सुरवात केली. दरम्यान विवाहितेने माहेरहून तीन लाख आणले मात्र तरीदेखील त्यांनी पैशांची मागणी सुरूच ठेवली व पैसे आणले नाही म्हणून तिला शारीरिक मानसिक त्रास देवून माहेरी सोडून देण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिसात सहा जणाविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.