मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १२ तारखेला पारोळा शहरात
शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
खान्देश टाइम्स न्यूज l पारोळा l येथील महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भव्य जाहीर सभा मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजता पारोळा शहरातील एन. इ. एस हायस्कूल पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. सभेचे महायुतीतर्फे नियोजन करण्यात येत आहे.
राज्यभरामध्ये गेल्या अडीच वर्षापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट तसेच महायुतीच्या विविध घटकांच्या महायुती सरकारने स्तुत्य निर्णय घेऊन विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न केला. लाडके बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे महिला भगिनींमध्ये लोकप्रिय झाले.
आता पारोळा शहरात प्रथमच एकनाथराव शिंदे यांची जाहीर सभा होत असल्यामुळे सभेला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभेसाठी पारोळा व एरंडोल मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला भगिनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.