जळगाव : मनपा प्रशासनाने थकबाकीदारांकडून वसुलीची मोहीम सुरू केली असून थकबाकी न भरणाऱ्या 25 मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन शुक्रवारी शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयाअंतर्गत आलेल्या थकबाकीदराचे तोडण्यात आले.
शहरातील मोबाईल टॉवर्स व मालमत्ताधारकांकडे महापालिकेची २०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये चालू वर्षीच्या८८ कोटी पैकी ४० कोटी व मागील ११६ कोटींपैकी फक्त ७ कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली असून १५७ कोटी रुपयांची थकबाकी शहरातील मालमत्ताधारकांकडे थकीत आहे.
थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशाने वसुलीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. ज्या थकबाकीदारांकडून मालमत्ता कर भरला जाणार नाही, अशा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात येणार आहे.
नळ कनेक्शन कट केल्यानंतर देखील संबधित मालमत्ताधारक कर भरत नसेल तर, त्यांच्या मालमत्ता जप्तीचीदेखील मनपाकडून करण्यात येणार आहे. या मोहीमेला सुरुवात झाली असून शुक्रवारी २५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत.