गुन्हेजळगांवपोलीसशासकीय

मोठी बातमी : जेसीबीद्वारे मनपाच्या पाईपलाईनची चोरी, दिग्गज अडकणार?

खान्देश टाइम्स न्यूज । जळगाव । गिरणा पंपींग प्लांटवरून जळगाव शहराकडे येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रामानंद नगर पोलिसात देखील अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती असून शहरातील काही दिग्गजांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२ रोजी ते उमाळे येथील फिल्टर प्लॉन्टचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्यांना कॉण्ट्रक्टर सुमीत सोनवणे यांनी फोन केला. गिरणा पंपींग जवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरोले यांनी सहकारी नरेश चंद्रात्रे (पंप अटेण्डंट), अनिल रतन पाटील (मजुर) अशांना तात्काळ सदर ठिकाणी जावुन शहनिशा करण्यास व मी देखील सदर ठिकाणी येत असल्याचे सांगितले.

जेसीबीच्या साहाय्याने चोरी करताना पकडले :
काही वेळाने नरेश चंद्रात्रे सदर ठिकाणी दोन इसम जेसीबीच्या सह्याय्याने जुनी पाईप लाईन उकरुन तेथील बीडाचे पाईप काढत असल्याचे बोरोले यांना कळवले. सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास योगेश बोरोले हे शामकांत भांडारकर (इंजीनिअर), विशाल सुर्वे, दिपक चौधरी यांच्यासह त्याठिकाणी पोहचले. एक पिवळ्या रंगाचे जेसीबी वाहन क्र. एमएच.३२.पी.३८५५ यावरील दोन इसम हे जेसीबीच्या साह्याय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळुन आले. त्यावेळी आम्ही सदर इसमांना तात्काळ सदरचे काम थांबविण्यास सांगितले व त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यानी त्याचे नाव नरेंद्र निवृत्ती पाणगडे, वय ३० वर्षे, व्यवसाय जेसीबी चालक/मालक, रा.शिरसोली व रवण चव्हाण रा.शिरसोली असे असल्याचे सांगितले.

एकाने काढला पळ, तिघांची सांगितली नावे :
अधिकाऱ्यांनी दोघांना जेसीबीच्या खाली उतरण्यास सांगितले असता रवण चव्हाण हा लक्ष विचलीत करुन तेथून पळून गेला. नरेंद्र पाणगडे याचे कडे चौकशी करीत असताना अक्षय अग्रवाल हा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला. नरेंद्र पाणगडे यास सदरची पाईप लाईन कोणी खोदावयास सांगितली? अशी विचारणा केली असता त्याने अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांचे सांगण्यावरुन खोदली असुन सदर जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल याने मला सांगितल्याने मी सदर जेसीबी आणुन त्याव्दारे पाईप लाईन खोदुन त्यातुन जुने पाईप काढत असल्याचे सांगितले.

जेसीबी, पाईप जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा :
अधिकाऱ्यांनी अक्षय अग्रवाल याचेकडे चौकशी केली असता त्यानेच सदर जेसीबी वाहन सदर ठिकाणी पाठविल्याचे सांगितले. तसेच नरेंद्र पाणगडे याने त्याठिकाणाहुन ६बीडचे पाईप खोदुन काढले असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांना तिथे ६ बीडचे पाईप मिळून आले. यापुर्वी देखील त्या ठिकाणाहुन जुनी पाईप लाईन उकरुन त्यातील बीडचे पाईपची चोरी झाली असल्याने मी अक्षय अग्रवाल व जेसीबी चालक नरेंद्र पाणगडे यांना सदर पाईप काढणे बाबत जळगाव महानगरपालीका तसेच शासनाकडुन ठेका अथवा परवानगी देण्यात आली आहे अगर कसे? याबाबत विचारणा केली असता त्यानी नकार दिला. यावरुन अक्षय अग्रवाल, नरेंद्र पाणगडे, भावेश पाटील व अमिन राठोड यानी संगणमत करुन त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सदर पाईप लाईन उकरुन त्यातील बीडाचे पाईपची चोरी करीत असल्याची अधिकाऱ्यांची खात्री झाली.

शहरात जोरदार चर्चा :
त्याठिकाणी जळगाव महानगर पालीका येथून ट्रक्टर व कर्मचारी बोलावुन चोरीच्या उद्देशाने काढलेले एकुण सहा बीडाचे पाईप ट्रक्टरमध्ये ठेवले व जेसीबी वाहन व पाईप सोबत घेवुन जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाहीसाठी आणले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकारचा एक गुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात देखील दाखल असल्याची माहिती समोर येत असून जळगाव शहरातील काही दिग्गज व्यक्तींच्या सांगण्यावरून ही चोरी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button