सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांची मागणी
भुसावळ (प्रतिनिधी) :– येथील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात कार्यरत प्रा.एकनाथ जी. नेहेते यांचे वेतन व पेंशन केस थांबविण्याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव यांना तक्रार अर्ज दाखल केला होता.
या तक्रार अर्जाची दखल घेत शिक्षण सह संचालक यांनी कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांना सानप यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुशंगाने अर्जात नमुद केल्यानुसार आपला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह खुलासा दोन दिवसात या कार्यालयात सादर करण्यात यावा, असे पत्र क्र. सस/उशि/जविज/सेनिवे/तक्रार/2024 दि.13-11-2024 रोजी डॉ.कपिल सिंघेल यांनी दिले आहे.
तक्रार अर्जात नमुद केले आहे की, भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील प्रा. ई.जी. नेहेते यांनी मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे वेळापत्रकानुसार नेमून दिलेल्या तासिका घेतल्या नसून अभ्यासक्रम पूर्ण न करता आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे.
याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी महाविद्यालयाकडून प्रा.एकनाथ जी. नेहेते यांनी घेतलेल्या तासिकांचा तपशील माहितीच्या अधिकारात मागितला असता महाविद्यालयाने ते देण्यास नकार दिल्याने शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव यांच्याकडे याबाबत अर्ज करून प्रा. एकनाथ जी नेहेते यांच्या विरोधात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे परीक्षेत केलेल्या गैरवर्तनिकी बाबत चौकशी सुरु आहे. तरी एखाद्या व्यक्तीची विभागीय किंवा विद्यापीठीय चौकशी सुरू असताना त्यांची पेन्शन केस थांबविली जाते असा महाराष्ट्र शासन नागरी संहितेत नियम आहे. या नियमाचा आधार घेत नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार्या सदर प्राध्यापकाची पेन्शन केस थांबविण्यात यावी व असे कामचुकार व शिक्षण क्षेत्रास काळीमा फासणार्या प्राध्यापकांना वेळीच थांबविता यावे यासाठी मागील दोन वर्षांचे वेतन यांच्याकडून वसूल करावे, असे तक्रार अर्जात नमुद असून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी केली आहे.