भुसावळ : बालेवाडीतील खासगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्चशिक्षित तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचे वृत्त शहरात धडकताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
भुसावळ शहरातील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावतील नगरमधील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे राहणारे मयूर रवींद्र भारसके (वय २५) व तुषार रवींद्र अहिरे (वय २६) अशी या घटनेतील मयतांची नावे आहेत. या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट
लिमिटेड या खासगी कंपनीतील आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यातील दोघे जण दुधीवरे हद्दीतील पवना धरणाच्या पाण्यात दुपारी ४ वाजता वाजता पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, धरणात बुडालेल्या दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, एकाच वयोगटातील शहरातील दोन्ही तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यासह भुसावळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.