जळगाव / नागपूर प्रतिनिधी नागपूर येथे रविवारी राजभावनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला यावेळी. 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ राज्यपाल पीसी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत घेतली. याप्रसंगी जिल्ह्यातून पुन्हा एकदा तीन कॅबिनेट मंत्री मिळाले असून यात भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे संजय सावकारे यांचा यात समावेश आहे. जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री मिळाल्यामुळे जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यात रखडलेले लहान मोठे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
जामनेर विधानसभा मतदारसंघातून सातव्यांदा विजयी झालेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. तसेच ते भाजपचे संकट मोचक मंत्री सुद्धा ओळखले जातात. गिरीश महाजन यांनी या अगोदर जलसंपदा मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री नाशिकचे पालकमंत्री यासह अन्य खात्याचे मंत्री म्हणून यशस्वीरित्या कारभार पाहिला आहे.
शिवसेना नेते व खानदेश मुलुख मैदान तोफ म्हटले जाणारे गुलाबराव पाटील यांना देखील पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली असून ते या अगोदर पाणीपुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे.
भुसावळचे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले संजय सावकारे यांची भाजपने कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे.