खान्देश टाइम्स न्यूज | २२ जुलै २०२३ | जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची शुक्रवारी सायंकाळी बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने काही जण आर्थिक पोळी शेकून घेत असल्याचे वृत्त खान्देश टाइम्स न्यूजने प्रसिद्ध केले होते. दरम्यान, अमन मित्तल यांची बदली झाल्याने दोन नवख्या तरुणांच्या मागे कामांचा हवाला घेतल्याने गर्दी असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकारी जाता जाता कामे मार्गी लागतील की नाही अशी धाकधूक अनेकांना लागून आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात चहा कट्ट्यावरची चर्चा अशा आशयाखाली खान्देश टाइम्स न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते. खान्देश टाइम्स न्युजच्या वृत्तानंतर महसुलच्या एका कर्मचाऱ्याची बदली देखील करण्यात आली होती. आर्थिक मदार सांभाळणाऱ्या चौकडीतील दोन खाजगी तरुण एक ‘मंत्री’ निकटवर्तीय असलेला तरुण आणि दुसरा रिंगरोडवासी ‘बे’दडक व्यक्तिमत्व असलेला तरुण असे असल्याची चर्चा होती. साहेबांच्या जवळचा असल्याचे सांगत दोघांनी अनेकांना चॉकलेट दिले होते. दोघे जवळचे मित्र असल्याने आपसी मतभेद नसल्याने कामे देखील मार्गी लागत होते.
शुक्रवारी राज्यातील ४१ आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यात जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची देखील बदली करण्यात आली. अवघ्या १० महिन्यात झालेल्या बदली मागे गेल्या काळात झालेली टीका, संकटमोचक आणि बुलंद तोफ नेत्यांची नाराजी, माध्यमांनी केलेली वाळूची पोलखोल आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारी देखील कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मित्तल यांच्या बदलीचे वृत्त पसरताच हवाला घेणाऱ्या रिंगरोड स्थित बेधडक तरुणाच्या मागे विचारणा करणाऱ्यांचा ससेमिरा सुरू झाल्याची चर्चा होती.
दुसरा गडी मात्र आश्वासनांची खिरापत वाटत घरी बसून होता. कामाचा हवाला घेत दोघांनी मोठी रक्कम गोळा केली असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. अनेक जण शनिवारी देखील आपले काम मार्गी लागेल अशी अपेक्षा लावून आहेत.
कार्यतत्पर मित्तल साहेब आपले कर्तव्य बजावून इतरत्र जातील यात शंका नाही मात्र राजाच्या नावाने पोळी शेकू पाहणाऱ्या या फेकूंना कोण लगाम घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मित्तल साहेब गेले तरी उद्या येणारे जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या विकासाचा विडा उचलतील मात्र अशा प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना गोचीडप्रमाणे चिकटू नये हीच अपेक्षा आहे.