कुसुंब्याचा तलाठ्याला अटक, जळगाव एसीबी ची कारवाई
जळगाव प्रतिनिधी :-कुसुंबा येथील तलाठ्याला सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.नितीन शेषराव भोई (वय ३१ वर्षे) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदाराने त्यांचे आई व भावाचे नाव सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र यासाठी तलाठी नितीन शेषराव भोई याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे 7 जानेवारी रोजी केली होती. या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता तलाठी नितीन भोई याने सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी सुरुवातीला पाच हजार तर नंतर चार व तडजोडी अंति 3000 रुपयांची मागणी केली. त्यानुसार आज 7 जानेवारी रोजी तलाठी नितीन भोई हा तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.