
भूजल पुनर्भरणासाठी जळगावात भरारी फाउंडेशन आणि क्रेडाईचा संयुक्त उपक्रम; चित्ररथाला हिरवा झेंडा
जळगाव : वाढत्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना म्हणून भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते २० जून दरम्यान भूजल पुनर्भरण अभियान राबविले जाणार आहे. या उपक्रमाचा आज 28 एप्रिल रोजी वर्ष बाराव्या अभियानाचा प्रारंभ काव्यरत्नावली चौकात चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
भूजल पातळीतील घट रोखण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पावसाळ्यातील छतावरील पाणी जमिनीत सोडण्याबाबत जनजागृती करण्यासाठी चित्ररथ शहरातील विविध भागात फिरणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत लघुपट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आदी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेमध्ये पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग करण्याचे संदेश दिले जाणार आहेत.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “शहरातील मोकळ्या जागांमध्ये शोष खड्डे तयार करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या उपक्रमासाठी लागणाऱ्या सर्व बाबतीत आमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.” तसेच क्रेडाईचे अनिश शहा यांनी नवीन बांधकामांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा अनिवार्य करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.
या अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण यंत्रणा बसवलेल्या दहा नागरिकांचा ‘जलरत्न’ सन्मानही करण्यात आला. यामध्ये रवींद्र लढ्ढा, नरेंद्र चौधरी, लखीचंद जैन, जितेंद्र चौहान, प्रदीप अहिरराव, शंतनू चौधरी, मनीषा पाटील, शुभश्री दप्तरी, निलेश झोपे आणि रोहिणी देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, अनिश शहा, डॉ. पी. आर. चौधरी, धनंजय जकातदार, अनिल कांकरिया, रवींद्र लढ्ढा, दीपक सराफ, आदर्श कोठारी, चित्रा चौधरी, सपन झुनझुनवाला, अनिल भोकरे, अमर कुकरेजा, विजय वाणी, सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक एस. आर. पाटील आणि प्रविण पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन दीपक सराफ यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय सोनवणे, सागर पगारिया, निर्णय चौधरी, सागर परदेशी आणि निलेश पाटील, रोहिणी मोरडिया यांनी विशेष योगदान दिले.