महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे – जिल्हाधिकारी

महिला बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट ; बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावे – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली डीएलसीसीची बैठक
जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून “लखपती दीदी” उपक्रमाला गती मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समन्वय समिती (DLCC) ची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, जिल्हा लीड बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा, तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना कर्ज सहज मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
या बैठकीत जिल्ह्यातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये –
ठेवी आणि कर्ज वाटपातील तफावत
नाबार्ड कर्ज सहाय्य
क्रेडिट-डिपॉझिट रेशो
किसान क्रेडिट कार्ड वाटप
पीक कर्ज वितरण
वार्षिक पत आराखडा (ACP)
महिला बचत गट आणि वैयक्तिक कर्ज सुविधा
कर्ज वितरण व उद्दिष्टपूर्तीबाबत सूचना
पीक कर्ज वाटप: बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज उपलब्ध करून द्यावे.
वार्षिक पत आराखड्याअंतर्गत (ACP) नियोजन: ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार कर्ज वितरण व्हावे.
लघु व मध्यम उद्योगांना मदत: उद्योग आणि बँक यांच्यात समन्वय राखण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने विशेष बैठक घेण्यात यावी.
भांडवली मदत: लघु व मध्यम उद्योगांना भांडवली सहाय्य मिळावे यासाठी बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी.