
जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीच्या दरात वाढ
जळगाव: जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात सलग दोन दिवस घसरण नोंदवली गेली आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहारादिवशी सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घट होऊन प्रति तोळा दर ९६,८०० रुपये (जीएसटीसह ९९,७०२ रुपये) झाला.
दुसरीकडे, चांदीच्या दरात १,००० रुपयांची वाढ झाली असून, चांदीचा प्रति किलो दर आता ९८,००० रुपये झाला आहे.चालू आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळा दर ९५,८०० रुपये होता.
मंगळवारी यात १,४०० रुपयांची वाढ होऊन दर जीएसटीसह १,००,११६ रुपये झाला होता. बुधवारीही हा दर एक लाखाच्या वर कायम होता. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत सलग घसरण होऊन सोन्याचा दर पुन्हा एक लाखाच्या खाली आला.
मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात एकूण ९०० रुपयांची घट झाली आहे.यापूर्वी २१ आणि २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर अनुक्रमे १,००,४२५ आणि १,०९,९७० रुपये (विनाजीएसटी ९९,००० रुपये) प्रति तोळा इतके होते. गेल्या वेळी सोन्याचा दर एक लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर घसरण झाली तेव्हा तो १,३०० रुपयांनी वाढला होता. यंदा मे महिन्यातील दरवाढीनंतर झालेल्या घसरणीत सोन्याचा दर ३,९०० रुपयांनी वाढला आहे.