खान्देश टाईम्स न्यूज l महात्मा ज्योतीराव फुले जीवनदायी योजनेत विविध आजारांचा समावेश करणेबाबत आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला.
यावेळी बोलतांना आ. एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात विशेषतः जळगाव जिल्ह्यात गर्भ पिशवीचे आजार, अपेंडिक्स, बाळंतपणातील शस्त्रक्रिया, पिताशयाचा खडा, हार्निया, हायड्रोसील यासारख्या दुर्धर आजारांनी पीडित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून सदर आजारांचा समावेश महात्मा ज्योतीराव फुले जीवनदायी योजनेच्या यादीत नसल्यामुळे गरजू लाभार्थी रुग्ण उपचारांपासून वंचित राहत लागत आहे असे असल्यास, समाजातील दुर्बल घटकांना, गरजू लाभार्थी रुग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी वरील सर्व आजारांचा सदर योजनेत समावेश करावा अशी मागणी मा.लोकप्रतिनिधी यांनी दिनांक २५ मे २०२३ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे, हे खरे आहे काय, असल्यास, महात्मा ज्योतीराव फुले जीवनदायी योजनेत सदर सर्व आजारांचा समावेश करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले यातील बहुतांशी आजारांचा महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश आहे. बाळंतपणातील शस्त्रक्रिया वगळता हे आजार दुर्धर नसून प्राथमिक स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या बाबतचे दिनांक २५ मे २०२३ रोजी केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत विभागास प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.