खान्देश टाइम्स न्यूज | २९ जुलै २०२३ | जळगाव शहरातील फोर सिझन रिक्रियेशन संदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, मावळते जिल्हाधिकारी यांनी गेल्या आठवड्यात हॉटेलचा ताबा घेण्यासंदर्भात आदेश पारीत केला होता. महेशकुमार प्यारपानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. खंडपीठाने त्यावर निर्णय देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देत ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एका बेदमुथा नामक तरुणाने ५० किलो मिठाईचा व्यवहार घडवून आणल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील हॉटेल फोर सिझन रिक्रीयेशनच्या मालकीबाबत डीआरटी न्यायालयाने १ मे २०२३ रोजी आदेश पारित केले होते. न्यायालयाने हॉटेल परिसराचे हक्क महेशकुमार पुरनमल प्यारपानी यांच्याकडे संरक्षित केले होते. डीआरटी कोर्टाचे आदेश असताना देखील मावळते जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दि.१८ जुलै रोजी सीआरपीसी १४५(२) नुसार आदेश करून परिसराचा दि.२४ जुलैपर्यंत ताबा घेण्याचे आदेश तहसीलदार जळगाव यांना दिले होते.
आदेशानुसार तहसीलदार नामदेव पाटील यांनी महेशकुमार प्यारपानी यांना ताबा घेण्याची नोटीस बजावली होती. नोटीस मिळताच प्यारपानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली होती. याचिकेवर खंडपीठात कामकाज झाले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तत्काळ स्थगिती देण्यात आली. खंडपीठाने आदेशात स्पष्ट नमूद करताना म्हटले की, जर याचिकाकर्त्यांच्या संरक्षणाला कोणतीही बाधा पोहचली तर ते न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असेल. कलम १४५ नुसार केलेली कार्यवाही सार्वजनिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहे, त्यामुळे कार्यवाहीच्या नावाखाली याचिकाकर्त्याला आपल्या मालमत्तेचा हक्क गमवावा लागेल असे होऊ नये, असे न्यायालयाने म्हटले.
खंडपीठाने दिलेल्या आदेशाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. दरम्यान, याच प्रकरणाची जळगावात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून एका बेदमुथा नामक तरुणाने गेल्या शनिवारी ५० किलो मिठाईचा व्यवहार घडवून आणल्याची चर्चा आहे. जळगावात कोल्हे हिल्स परिसरातील एका मोठ्या लेआऊट संदर्भात देखील असाच मोठा व्यवहार काही दिवसापूर्वी घडल्याची देखील चर्चा समोर येत असून सध्या याप्रकरणी मालमत्ताधारकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे समजते.
दरम्यान, याबाबत प्यारपानी कुटुंबीयांशी संपर्क साधला असता खंडपीठाने स्थगिती दिली आहे. येत्या काही दिवसात या मालमत्ते संदर्भात खंडपीठाचा आणखी एक निर्णय येण्याची अपेक्षा असल्याची माहिती त्यांनी दिली.