
माहिती अधिकारात माहिती उघड, बदली टाळल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांचा आरोप
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्यात हे.कॉ. ०९११ गिरीश दिलीप पाटील हे मागील ९ वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढल्यावर सुद्धा ते गेल्या ९ वर्षांपासून पोलीस स्टेशनला कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी दिली आहे. एकाच पोलीस ठाण्यात एखाद्या पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची इतकी प्रदीर्घ कालावधीसाठी नियुक्ती होणे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला खो..
पोलिस विभागातील नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याची विशिष्ट ठिकाणी दीर्घकाळ नियुक्ती राहू नये, म्हणून ठराविक कालावधीनंतर बदल्या केल्या जातात. मात्र, गिरीश पाटील हे ९ वर्षांपासून शनिपेठ ठाण्यात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मागील ५ वर्षांपासून त्यांची बदली होण्याची अपेक्षा असूनही ते त्याठिकाणी कार्यरत आहेत. या प्रकरणात त्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडून पाठबळ मिळत आहे का? अशीही चर्चा रंगली आहे.
माहिती अधिकारातून मिळाली माहिती :
माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी मागविलेल्या माहितीमधून धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जळगाव पोलीस अधीक्षकांनी २ वेळा गिरीश पाटील यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र, तरीही त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे दिसून येत नाही. यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे का? याबाबतही चर्चा रंगली आहे. याकडे स्वतः पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे आणि योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एखाद्या पोलिस खात्यात एका ठिकाणी इतक्या वर्षांपर्यंत काम करणे नियमानुसार योग्य आहे का? याबाबत स्पष्टीकरण दिले जावे, अशीही मागणी होत आहे. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.