भादली येथे माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या, गावात तणाव
जळगाव प्रतिनिधी: जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असून, आज सकाळी भादली गावात धक्कादायक प्रकार घडला. शिवसेना (शिंदे गट) चे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज सकाळी ८ वाजता युवराज कोळी हे घराबाहेर असताना, तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना जागीच ठार करण्यात आले. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हत्या झाल्याची माहिती मिळताच गावकरी आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली. संतप्त कुटुंबीयांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
युवराज कोळी यांच्या हत्या प्रकरणामागे नेमकं काय कारण आहे, हा राजकीय वाद आहे की वैयक्तिक शत्रुत्व? याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेने जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.