
जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय : ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार
जळगाव : जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या अखेरीस नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत शासकीय व्यवहार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय बँका व कार्यालयांना विशेष वेळापत्रक
३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने शासकीय व्यवहार करणाऱ्या बँकांसाठी विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा, जळगाव तसेच तालुका मुख्यालयातील उपकोषागार आणि अधिकृत स्टेट बँकेच्या शाखा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
महत्त्वाच्या सूचना :
३० व ३१ मार्च रोजी सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा कोषागार कार्यालये आणि शासकीय व्यवहार करणाऱ्या बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहतील.
३१ मार्च रोजी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागार/उपकोषागार सुरू असेपर्यंत मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
३१ मार्च सायंकाळी ६ नंतर उपकोषागार कार्यालये कोणतेही देयक स्वीकारणार नाहीत.
सुधारित अंदाजपत्रक आणि पुरवणी मागणीतून मिळालेल्या अनुदानातील मोठी वैयक्तिक लाभाची देयके उपकोषागारात न सादर करता थेट जिल्हा कोषागारात सादर करावीत.
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे शासकीय व्यवहार अधिक वेगाने पार पडणार असून, नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.