
हत्यांचे सत्र सुरूच! भुसावळ, जळगावनंतर वरणगावमध्येही खून; दारूच्या नशेत पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
वरणगाव (प्रतिनिधी): ;– जळगाव जिल्ह्यात हत्यांचे सत्र अद्यापही सुरूच असून, भुसावळ आणि जळगावनंतर आता वरणगावजवळील विल्हाळा शिवारात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप असून, आरोपी अजीज सलीम शेख (वय ३३) सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
विल्हाळा शिवारातील गट क्रमांक ६५१ मध्ये परळी वैजनाथ (जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर हे आपल्या कुटुंबासह विटभट्टीवर कामासाठी आले होते. त्यांच्यासोबत मुलगी सना शेख (वय २५) व जावई अजीज सलीम शेख हेही आपल्या चार मुलांसह विट तयार करण्याचे काम करत होते. संपूर्ण कुटुंब पत्र्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्यास होते.
अजीज शेखला दारूचे गंभीर व्यसन असल्याने तो सतत पत्नीशी भांडण करत असे. शनिवारी रात्री तो दारूच्या नशेत घरी आल्यानंतर पत्नी सना शेख हिच्याशी वाद झाला. सासूने मध्यस्थी करत त्याला समजावले आणि जेवणाचा आग्रह धरला. त्यानंतर दोघेही आपल्या खोलीत झोपायला गेले.
रविवारी पहाटे कामासाठी उठवायला गेल्यावर सनाच्या खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडताच सासू आणि मजुरांच्या अंगावर काटा उभा राहिला! सना शेख रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या डोळ्या-नाकातून रक्तस्त्राव होत होता आणि गळ्यावर व्रणांचे स्पष्ट निशाण होते. त्यामुळे गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
सना शेख हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र शवविच्छेदन अहवालातूनच अंतिम निष्कर्ष समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर अजीज सलीम शेख फरार झाला आहे. पत्नीच्या हत्येचा संशय त्याच्यावरच असल्याने, मृत सना हिचा भाऊ अजहर नियाजउद्दीन शेख मन्सूर यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सह पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पो.कॉ. सुकराम सावकारे, मनोहर बनसोडे, भूषण माळी, साहेबराव कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबनराव अव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सह पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथक कार्यरत असून, अजीज सलीम शेखच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे मारण्यात येत आहेत.