
गोडाऊन फोडून ८.३५ लाखांच्या पापड मसाल्याच्या ७१ गोण्या चोरी
एमआयडीसी परिसरात चोरीचा धक्कादायक प्रकार
जळगाव शहरातील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीच्या गोडाऊनमधून सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ‘राम बंधू’ पापड मसाल्याच्या बंद पाकिटांच्या ७१ गोण्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. हा प्रकार २६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल विश्वनाथ मुळे (वय ५९, रा. जीवन मोती सोसायटी, मोहाडी रोड, जळगाव) हे या गोडाऊनचे मालक असून, ‘एम’ सेक्टरमध्ये त्यांनी श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर्स नावाचे गोडाऊन सुरू केले आहे. या गोडाऊनमध्ये ‘राम बंधू’ पापड मसाल्याच्या बंद पाकिटांची साठवणूक केली जात होती.२४ मार्च ते २६ मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकवून आत प्रवेश केला आणि ८.३५ लाख रुपये किमतीच्या ७१ गोण्या चोरून नेल्या. बुधवारी सकाळी ९.३० वाजता चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुळे यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी गुरुवारी (२७ मार्च) सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू केले असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.