
तरुण ट्रॅक्टर चालकाची आत्महत्या ; रेल्वेखाली झोकून देत जीवनयात्रा संपविली
रावेर ;- सुनोदा गावाजवळील रेल्वे मार्गावर २६ मार्च रोजी रात्री ८ ते ९ दरम्यान सागर अशोक चौधरी (वय ३०) या तरुण ट्रॅक्टर चालकाने स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
रेल्वे ट्रॅकजवळ आढळलेल्या कपड्यांवरून व अंगावरील खुणांवरून सागर यांची ओळख पटली. रेल्वे विभागाचे अधीक्षक तसेच स्टेशन मास्तर यांच्या माहितीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. ओळख पटल्यानंतर २७ मार्च रोजी दुपारी २ वाजता तांदलवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
सागर चौधरी यांच्या पश्चात आजी, आजोबा, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.