
नशिराबादजवळ भीषण अपघातामध्ये जुळया भावांपैकी एक ठार ,दुसरा जखमी
जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. या अपघातात चैतन्य सुपडू फेगडे (वय २२, रा. निंभोरा, ता. रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा जुळा भाऊ चेतन फेगडे गंभीर जखमी झाला आहे.
३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. चैतन्य आणि चेतन आपल्या आई-वडिलांसोबत घरकुल योजनेच्या कामानिमित्त जळगावकडे निघाले होते. वडील रिक्षाने पुढे गेले, तर दोन्ही भाऊ दुचाकी (क्र. एमएच १९ ईई १७०२) घेऊन निघाले होते. मात्र, नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला जाऊन धडकली.
अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला, तर चेतनला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची नोंद नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मयत चैतन्य एक वर्षापूर्वीच रेल्वे विभागात नोकरीला लागला होता. या दुर्दैवी घटनेमुळे फेगडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.