खान्देशगुन्हेजळगांव

गोडाऊन फोडणारी टोळी ४८ तासांत गजाआड, ८.३५ लाखांचा माल जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई:

गोडाऊन फोडणारी टोळी ४८ तासांत गजाआड, ८.३५ लाखांचा माल जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई:

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव एमआयडीसी परिसरातील गोडाऊन फोडून ८ लाख ३५ हजार रुपयांचा माल चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

एमआयडीसीतील एम सेक्टर २११/२ येथे अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची ‘श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स’ ही कंपनी आहे. कंपनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत रामबंधू मसाले कंपनीची डीलरशिप सांभाळते. २५ मार्च २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर तोडून ७१ गोण्या मसाल्यांचा साठा चोरला. चोरीस गेलेल्या मालाची किंमत ८.३५ लाख रुपये आहे. २७ मार्च रोजी फिर्यादी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा क्रमांक २२९/२०२५ अन्वये भादंवि कलम ३३१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तपासासाठी सक्रिय झाले.

पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे , पोलीस कर्मचारी चंद्रकांत धनके, राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, रतन गिते यांच्या पथकाने तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपींनी तोंडाला रुमाल बांधून ईको कारच्या मदतीने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषण व तपासाच्या आधारे मुख्य आरोपी अनिल रमेश पाटील (रा. मिल कॉलनी, खडका, ता. भुसावळ) याची ओळख पटली. अनिल पाटील हा फिर्यादी अतुल मुळे यांच्या कंपनीत १५ वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत होता. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या सहकारी आरोपींची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण माल जप्त केला. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button