
जळगावात ‘ईद पाडवा’चा अनोखा उत्सव; सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश
शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजन
जळगाव :- गुढी पाडवा आणि ईद या दोन पवित्र सणांच्या निमित्ताने जळगाव शहरात ‘ईद पाडवा’ हा अनोखा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सणांचा आनंद लुटत सामाजिक सौहार्द आणि शांततेचा संदेश दिला. कट्टर हिंदुत्व आणि कट्टर इस्लाम यांच्यासोबत कट्टर देशभक्तीही जोपासली पाहिजे, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केले.हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेला गुढी पाडवा आणि मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण ईद एकाच वेळी साजरा करून जळगावकरांनी सामाजिक एकतेचा एक अनोखा आदर्श घालून दिला. शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, राष्ट्रवादीचे एजाज मलिक, सोहेल अमीर, डॉ. विवेक जोशी, माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, अँड. पियुष पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, मानसिंग सोनवणे, डॉ. रागीब अहमद, माजी नगरसेवक जाकीर पठाण, अश्फाक मिर्झा, अयाज अली, अमजद पठाण, निलेश तायडे, शाहिद शेख, संजय वराडे, युवराज सोनवणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.चेतन वाणी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या सोहळ्याद्वारे आपण एकत्र येऊन सण साजरे करत शहरातील बंधुभाव वृद्धिंगत करू शकतो. हा उपक्रम आपल्या एकतेचे प्रतीक आहे. गेल्या ८ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून, परिसरात सामाजिक सौहार्द आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यात यश आले आहे. वसीम खान यांनी आभार मानताना म्हटले की, ईद आणि गुढी पाडवा यांचा संगम आपल्या संस्कृतीच्या वैविध्याचे द्योतक आहे. सर्वांनी या आनंदात सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.
युवकांनी देशभक्ती अंगीकारावी : पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, जाती-धर्मात तेढ निर्माण न करता सर्वांनी सौहार्दाने राहून सामाजिक शांतता कायम ठेवावी. युवकांनी कट्टर देशभक्ती आत्मसात करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा. आपल्या धर्म आणि जातीचा अभिमान बाळगताना दुसऱ्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर्वी बॅनर-पोस्टरमुळे वाद व्हायचे, आता सोशल मीडियामुळे वाद होतात. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यांचे समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मान्यवरांचे प्रेरक विचार
पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित म्हणाले की, हा सोहळा समाजाला एकत्र ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे शांतता आणि सलोखा वाढतो. इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी सांगितले की, हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन समाज आणि देशासाठी कार्य करावे. उपवास प्रत्येक धर्मात असतात आणि ते आपल्याला संयम शिकवतात, असे ते म्हणाले.
ईद पाडवा समाजाला जोडतो
मुफ्ती हारून नदवी यांनी सांगितले की, सण हे एकतेचे प्रतीक आहेत आणि त्यातून शांततेचा संदेश दिला पाहिजे. सोहेल अमीर यांनी तरुणांना देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. एजाज मलिक यांनी स्व. गफ्फार मलिक यांनी परिसरात शांतता आणि मैत्री टिकवून ठेवल्याचे सांगितले. डॉ. रागीब अहमद आणि अँड. पियुष पाटील यांनीही एकता आणि शांततेच्या मूल्यांवर भर दिला.
शिरखुर्मा आणि फराळचा आस्वाद
या सोहळ्यात गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाचे स्वागत आणि ईदच्या शुभेच्छा देऊन आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थितांनी शिरखुर्मा आणि फराळचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याने सणांचा आनंद आणि एकतेचा सुंदर संगम दाखवला.
सोहळ्यासाठी परिश्रम
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शनिपेठ आणि शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाउंडेशनचे चेतन वाणी, वसीम खान, इमरान खान, अझर खान, हरीश मलीक, फिरोज शेख, फहीम खान, जावेद शेख, इस्माईल खान, इसरार खान, शोएब शेख, नझर खान, तस्लिम सय्यद, जकी अहमद, रिजवान सैय्यद, वसीम शेख, अयाज मोहसीन, आनंद गोरे, बबलू खान, रहीम पेंटर, चंदन मोरे, राकेश वाणी, मोहन कासार यांनी मेहनत घेतली.