
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जळगावच्या बाजारात सोनं ३००, चांदी तब्बल २००० रुपयांनी स्वस्त
जळगाव | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. याचा थेट परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर झाला आणि सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. मात्र, गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात दिलासादायक घसरण नोंदवली गेली आहे.
गुरुवारी जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्यात प्रति तोळा ३०० रुपयांची घट झाली. त्याचप्रमाणे चांदीचा दर तब्बल २,००० रुपयांनी घसरून प्रति किलो ₹९९,००० वर आला आहे, ज्यामुळे चांदी पुन्हा १ लाख रुपयांच्या खाली आली आहे.
बाजारभाव (शुक्रवार)
२२ कॅरेट सोनं (१० ग्रॅम): ₹८३,७८६
२४ कॅरेट सोनं (१० ग्रॅम): ₹९१,४००
जीएसटीसह अंतिम दर: ₹९४,१४२
चांदी (प्रति किलो): ₹९९,०००
सोन्याचा दर आणखी कमी होणार?
गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या दरात जवळपास २०% वाढ झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळाला. मात्र, आता काही तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. काही अंदाजानुसार, ही घसरण ३८% पर्यंत देखील जाऊ शकते. त्यामुळे सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.