
ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड होणार बंद; केंद्र सरकारकडून अंतिम संधी
जळगाव – केंद्र सरकारकडून गरीब व गरजू कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्ड दिले जाते. यामुळे गहू, तांदूळ, साखर यांसारख्या अन्नधान्याचा पुरवठा सवलतीच्या दरात मिळतो. मात्र आता, ज्या नागरिकांनी अद्याप रेशन कार्डसाठी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांचे कार्ड बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना दिलासा देत शासनाने या प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता ३० एप्रिल २०२५ ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत आहे.
जळगाव जिल्ह्यात ८ लाखांहून अधिक कार्डधारकांवर प्रभाव
जळगाव जिल्ह्यातील ८ लाख ३९ हजार ५५२ रेशनकार्डधारक अद्याप ई-केवायसी प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. परिणामी, त्यांचा रेशनपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेषतः चोपडा तालुक्यातील नागरिक याबाबत अद्यापही अंधारात आहेत.
ई-केवायसी करण्याची प्रक्रिया कशी करावी?
कार्डधारकांनी आधार कार्डसह शिधावाटप दुकानदाराकडे जावे.
प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड घेऊन जावे.
नवीन 4G ई-पॉस मशीनमध्ये अंगठ्याचे ठसे (बायोमेट्रिक) स्कॅन करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
सुरुवातीची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ होती.
त्यानंतर ती ३१ डिसेंबर २०२४ आणि नंतर ३१ मार्च २०२५ करण्यात आली.
मात्र, या काळात सर्व्हर डाऊन, मशीनच्या तांत्रिक अडचणी यामुळे अनेक नागरिक ई-केवायसी करू शकले नाहीत.
यंदा दिलेली ३० एप्रिल २०२५ ही अंतिम मुदत असून, यानंतर ई-केवायसी न केलेल्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.