
अभिषेक पाटील फाउंडेशन व समर्थ हॉस्पिटलतर्फे जळगावकर जनतेसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ॲम्बुलन्स सेवा
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर, अभिषेक पाटील फाउंडेशन आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ॲम्बुलन्स सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या सेवेमुळे शहरातील तातडीच्या वैद्यकीय गरजांमध्ये महत्त्वपूर्ण मदत होणार असून, विशेषतः अपघात, आपत्कालीन परिस्थिती किंवा रुग्णवाहिकेची कमतरता भासणाऱ्या प्रसंगी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अभिषेक पाटील यांच्यासोबत त्यांचे वडील शांताराम पाटील, आई कल्पना पाटील आणि पत्नी अरुंधती पाटील विशेष उपस्थित होते. या वेळी बोलताना अभिषेक पाटील म्हणाले, “जनतेच्या सेवेसाठी काहीतरी उपयोगी काम करावे, अशी इच्छा होती. ही ॲम्बुलन्स सेवा म्हणजे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.”
या उपक्रमाचे जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटना व नागरीकांनी स्वागत केले आहे. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून, खऱ्या अर्थाने ‘जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे तत्व या उपक्रमातून साकारले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.