
घराच्या वाटणीवरून जास्त हिस्सा मागणाऱ्या तरुणाचा खून
भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथील घटना , दोघा बाप लेकाला अटक
भडगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द गावात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्याच्या किरकोळ वादातून चिडलेल्या पित्याने आपल्या सख्ख्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली, तर भावानेही या क्रूर कृत्यात साथ दिली. या अमानवी मारहाणीत मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली आहे
.ही थरकाप उडवणारी घटना मंगळवार, ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) या तरुणाने घराच्या वाटणीत आपला हक्क मागितला, पण यावरून कुटुंबात वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, पिता राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी संतापाच्या भरात बाळूवर हल्ला चढवला
. सुरुवातीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर दोघांनी लाकडी दांडका उगारला आणि बाळूच्या चेहऱ्यावर तसेच छातीवर वार करत त्याचा जीव घेतला.घटनेची माहिती समजताच भडगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. गावचे पोलीस पाटील सुनिल लोटन पाटील (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत हा खटला दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.