
जळगाव | प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात सोमवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीसाठी हजारो अनुयायी शहरात दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहतूक मार्गांवर बदल:
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉवर चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप आणि नेहरू चौक या प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी बॅरिकेट्स लावण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले.
गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तयारी:
रविवारी रात्रीपासूनच अभिवादनासाठी अनुयायांची रेलचेल सुरू झाली आहे. विशेषतः मध्यरात्री रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी येथेही बंदोबस्त वाढवला आहे.
विशेष पोलीस बंदोबस्ताचे नियोजन:
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुसज्ज तयारी केली आहे. रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना योग्य सूचना दिल्या.
शहरातील बंदोबस्तात सहभागी अधिकारी:
-
पोलीस अधीक्षक – १
-
अप्पर पोलीस अधीक्षक – १
-
उपविभागीय पोलीस अधिकारी – १
-
पोलीस निरीक्षक – ६
-
क्युआरटी – १
-
आरसीपी – १
-
सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड
नागरिकांना सहकार्याचे आवाहन:
मिरवणूक शांततेत पार पडावी आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.