
अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा तापी नदीत बुडून मृत्यू; चिमुकल्यासह दोन महिलांचा दुर्देवी अंत
यावल | प्रतिनिधी अंजाळे (ता. यावल) गावाजवळील तापी नदीपात्रात सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा पाय घसरून डोहात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पाच वर्षांच्या बालकासह दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये – वैशाली सतीष भिल (वय २८, रा. अंतुर्ली, ता. अमळनेर) त्यांचा मुलगा नकुल सतीष भिल (वय ५) सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
या तिघी महिला अंजाळे येथील घाणेकर नगर भागात नातेवाइक बादल भिल यांच्या घरी गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर, सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता, त्या अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी जवळच्याच तापी नदीपात्रात गेल्या होत्या.
अंघोळ करत असताना पाय घसरून सर्वजण नदीच्या खोल भागात गेले आणि पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, अर्षद गवळी, इस्तीयाक सय्यद, अनिल पाटील, उमेश महाजन आदी पोलीस कर्मचारी पोहोचले.
ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली आणि काही वेळात तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. रात्री आठ वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकाच कुटुंबातील तीन जणांचा, विशेषतः एका निरागस चिमुरड्याचा, अशा प्रकारे अचानक झालेला मृत्यू ही हृदयद्रावक घटना असून गावात शोककळा पसरली आहे.