
फैजपुर नगरपालिकेतील स्वच्छता कामांमध्ये भ्रष्टाचार
माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांची चौकशीची मागणी
फैजपुर | प्रतिनिधी ;- फैजपुर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी केला असून, २१ एप्रिल २०२५ पासून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. घनकचरा व्यवस्थापन, ठेकेदारी प्रक्रिया आणि सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीत झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करावी, अशी त्यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे.
शेख कुर्बान यांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षांपासून नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात मोठ्या प्रमाणावर अपारदर्शक व्यवहार सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनात निधीचा अपव्यय, ठेकेदारांच्या निवडीमध्ये पक्षपातीपणा, आणि शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. मी याबाबत वारंवार तक्रारी केल्या, पण प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. लोकांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा असा गैरवापर न स्वीकारार्ह आहे,” असे ते म्हणाले.
शेख कुर्बान यांच्या आरोपांना स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. शहरातील नागरिकांच्या मते, स्वच्छतेसाठी खर्च होणारी रक्कम फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात कामांचा दर्जा अत्यंत खराब आहे. सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था हे या कथित भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.
या आरोपांवर फैजपुर नगरपालिकेकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. शेख कुर्बान यांनी स्पष्ट केले आहे की, २१ एप्रिलपासून उपोषण सुरू केले जाईल, आणि तोपर्यंत प्रशासनाने चौकशीस प्रारंभ केला नसेल, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. “हा लढा स्वच्छ प्रशासनासाठी आहे. पारदर्शक कारभार हवा असेल, तर तात्काळ चौकशी हवीच,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
या प्रकरणामुळे फैजपुर नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेचे लक्ष प्रशासनाच्या आगामी निर्णयाकडे लागले आहे.