
सोन्याची उसळी ; जळगावात सोन्याच्या दराने एक लाखांचा टप्पा ओलांडला
जळगाव | प्रतिनिधी अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावाचा थेट परिणाम आता जळगावच्या सुवर्णबाजारावरही दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल १७०० रुपयांची उसळी झाली असून, आज २४ कॅरेट सोन्याचा दर (जीएसटीसह) १ लाख २७९ पर्यंत पोहोचला आहे.
काल रात्री सोन्याचा दर ९८ हजार ५७९ होता, तर आज तो ९९ हजार ३०० रुपयांवर गेला असून जीएसटी धरून एकूण दर १ लाखाच्या पुढे गेला आहे. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे बाजारात खरेदीसाठी आलेले अनेक ग्राहक हात मोकळे करून दुकानांमधून बाहेर पडताना दिसले. परिणामी स्थानिक सराफ व्यावसायिक चिंतेत आहेत.
“सोन्याचे दर इतक्या झपाट्याने वाढले, तर सर्वसामान्य माणसासाठी ते स्वप्नवतच राहील,” असे एका सराफ व्यावसायिकाने सांगितले. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनीही दर पाहून पावले मागे घेतली आहेत.
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार तणाव, डॉलरच्या किमतीत झालेली हालचाल आणि जागतिक बाजारातील अस्थिरता हे सर्व घटक सोन्याच्या भाववाढीला कारणीभूत ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या घडामोडी पाहता सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जळगावसह राज्यातील अन्य सुवर्ण बाजारासाठी येणारे काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.