
सावद्यात मशिदीजवळ मृत बालक आढळला; शहरात संतापाची लाट
पोलिसांचा तपास सुरू; दोषींवर कारवाईची मागणी
सावदा | प्रतिनिधी – शेख मुख्तार
रावेर तालुक्यातील सावदा शहरातील रविवार पेठ, मोठा आखाडा मशिदीच्या बाहेर गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सकाळी एका अज्ञात व्यक्तीने तीन ते चार महिन्यांच्या मृत बालकाला सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण सावदा शहरात चिंता आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना मशिदीजवळ कपड्यात गुंडाळलेले बालक दिसले. जवळ जाऊन पाहिल्यावर बालक मृत असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तातडीने सावदा पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. स्थानिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत “मृत निरागस बालकाला रस्त्यावर अशा प्रकारे सोडून जाणे ही अमानुष व मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे,” असे म्हणत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सावदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अज्ञात व्यक्तीचा माग काढण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, “या प्रकारात गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा लवकरच शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल.” संपूर्ण शहर या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड संतप्त असून, पोलिसांकडून जलद गतीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.