
फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून मनोज बानी यांना अटक; २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
जळगाव : जुन्या घराच्या खरेदी व्यवहारात एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकत हस्तांतरण न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (वय ५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने संशयित मनोज लिलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
धरणगावचे सुनील चौधरी हे बांधकाम आणि जमीन खरेदी-विक्री व्यवसायात आहेत. जळगाव महापालिका हद्दीतील एका जुन्या बांधीव घराचा व्यवहार ठरवून सौदापावतीनुसार त्यांनी एक कोटी १५ लाख रुपये दिले. मात्र, व्यवहारानंतर मिळकत खरेदी करून देण्यात टाळाटाळ करण्यात आली. रक्कमही परत मिळाली नाही, म्हणून चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात मनोज वाणीसह कल्पना वाणी, शैलेंद्र भिरुड उर्फ तनुजा भिरुड, तिलोत्तमा इंगळे, दीपक इंगळे, संदीप पाटील, राजेंद्र सावदेकर, शेखर भिरुड, शिरीष भिरुड, नरेंद्रकुमार भिरुड, ज्ञानेश्वर भिरुड आणि गौरव भिरुड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि प्रमोद कठोरे करीत आहेत.