
शालकाच्या ५३ लाखांच्या विम्यासाठी खुनाचा कट; पोलिसांनी १० दिवसांत केला गुन्हा उघड !
प्रतिनिधी | पारोळा पारोळा तालुक्यातील एका कापूस व्यापाऱ्याने शालकाच्या नावे ५३ लाखांच्या विमा पॉलिसी घेऊन त्याचा खून करत अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या सखोल तपासाने अवघ्या दहा दिवसांत या कटाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली.१७ एप्रिलच्या रात्री घडलेल्या या घटनेत संदीप भालचंद्र पाटील (रा. शेवगे) याने शालक समाधान शिवाजी पाटील (रा. फागणे, जि. धुळे) याच्या नावे एलआयसीच्या तीन आणि खासगी कंपन्यांच्या दोन, अशा पाच विमा पॉलिसी घेतल्या होत्या. समाधान अपंग आणि व्यसनाधीन असल्याचा फायदा घेत संदीपने पत्नीला वारसदार ठरवून खुनाचा कट रचला.संदीप आणि त्याचा आतेभाऊ चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी, ता. अमळनेर) यांनी १७ एप्रिलच्या रात्री समाधानला स्कुटीवरून धुळे-पारोळा महामार्गावर नेले. तेथे लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला करून त्याचा खून केला आणि अपघाताचा बनाव रचला.पोलिसांचा सूक्ष्म तपास
संदीपने रात्री १०.३० वाजता अपघाताची खोटी माहिती पोलिसांना दिली. मात्र, घटनास्थळी रक्ताचे डाग दूरवर आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिस निरीक्षक सुनील पवार आणि उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी तपास सुरू केला. संदीपच्या परस्परविरोधी जबाब, मोबाईल सीडीआर, आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे खुनाचा कट उघड झाला. स्कुटी सुस्थितीत असल्याने अपघाताचा बनाव असल्याचे स्पष्ट झाले.दोघांना अटक, गुन्ह्याची कबुली
पुराव्यांनिशी पोलिसांनी संदीप आणि चंद्रदीप यांना अटक केली. चौकशीत दोघांनी गुन्हा कबूल केला. डीवायएसपी विनायक कोते आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा खुलासा केला.