
चाऱ्यासाठी शेतात गेलेल्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
कर्जबाजारीपणामुळे टोकाचा निर्णय
जळगाव प्रतिनिधी
तालुक्यातील बिलवाडी येथील भरत रतन वाघ (वय ३०) या दुग्धव्यवसायिक युवकाने रविवारी (ता. ४ मे) दुपारी चाऱ्यासाठी शेतात गेल्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भरत वाघ यांनी बचत गट व पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज घेत म्हशींची खरेदी केली होती. मात्र, व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता. कर्ज फेडण्याची चिंता वाढल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ भरत वाघ यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.