
यावल वनविभागात सातपुड्यातील झऱ्यांचे प्रथमच जिओ-टॅगिंग; १४ वनरक्षकांना प्रशिक्षण
यावल, दि. १५ मे २०२५: यावल (प्रादेशिक) वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुडा पर्वतरांगांतील हंगामी व बारमाही झऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी १४ वनरक्षकांना एन्ड्रॉइड फोनद्वारे जिओ-टॅगिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
सातपुड्यात प्रथमच होणाऱ्या या जिओ-टॅगिंगमुळे झऱ्यांची अचूक नोंदणी होणार असून, भविष्यात पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी याचा उपयोग होणार आहे.प्रशिक्षणादरम्यान भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे सहायक भूवैज्ञानिक सुधीर जैन आणि जीआयएस सहायक महेंद्र बाविस्कर यांनी एन्ड्रॉइड अॅप्लिकेशनद्वारे माहिती संकलनाचे प्रात्यक्षिक दाखवले.
या उपक्रमाला उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश वि. हाडपे (वनीकरण व वन्यजीव, चोपडा) आणि सहायक वनसंरक्षक समाधान पाटील (प्रादेशिक व केंम्पा, यावल) यांचे मार्गदर्शन लाभले. यावल आणि चोपडा वनपरिक्षेत्रातील प्रत्येकी दोन वनरक्षकांसह वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात उपस्थित होते.
वनविभागाने वनरक्षकांना जिओ-टॅगिंगसाठी आवश्यक वाहने आणि अन्य सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. यावल वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा यांच्या सहकार्याने संकलित होणारी ही माहिती जलसंधारण आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.