
पाळधीतील आगग्रस्त दुकानदारांचा इशारा : नुकसानभरपाई न मिळाल्यास आमरण उपोषण
धरणगाव : पाळधी (ता. धरणगाव) येथे धर्मीय द्वेषातून ३१ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री घडलेल्या दुकान फोडी व जाळपोळ प्रकरणातील २३ दुकानदारांनी अजूनही नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही पाच महिने उलटूनही मदत न मिळाल्याने या दुकानदारांनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात प्रशासनाला अधिकृत नोटीस देण्यात आली आहे.
धरणगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक १/२५ अन्वये काही समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित दुकानदार व जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या वतीने २५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सात दिवसांचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व धरणगाव तहसीलदार यांच्या उपस्थितीत शासनातर्फे त्वरित मदत मिळेल, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.
आता या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, न्याय मिळाला नाही, तर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार आगग्रस्तांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील नोटीसीची प्रत मुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक, एमआयडीसी व धरणगाव पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांना देण्यात आली आहे.
नोटीसीवर एकता संघटनेचे फारुक शेख, अनिस शहा, आरिफ देशमुख, मजहर पठाण, मतीन पटेल, अन्वर खान, हाफिज रहीम पटेल तसेच आगग्रस्त दुकानदार जावेद पिंजारी, शेख फारुक शरीफ, शकील शेख अब्दुल्ला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.