
पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात एनआयएची मोठी कामगिरी; दोन फरार दहशतवादी इंडोनेशियातून अटकेत
मुंबई : पुण्यातील आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई करत दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. इंडोनेशियात लपून बसलेल्या अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलहा लियाकत खान यांना एनआयएच्या पथकाने अटक केली असून, त्यांना भारतात आणून सध्या मुंबईत ठेवण्यात आले आहे. लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोघेही पुण्यात उघडकीस आलेल्या आयएसआयएस मॉड्यूलशी थेट संबंधित आहेत. या मॉड्यूलअंतर्गत त्यांनी IED तयार करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे, जंगलात फायरींगचा सराव, दहशतवादी कारवाया राबविण्यासाठी लपण्यासाठी जागा शोधणे, तसेच सशस्त्र दरोडे आणि चोरीद्वारे आर्थिक साधनसामग्री उभारणे अशा गंभीर गुन्ह्यांत सहभाग घेतला होता.
अब्दुल्ला फैयाज शेख हा पुण्यातील कोंढवा येथील मितानगरचा रहिवासी असून, तलहा लियाकत खान वानवडी परिसरात राहत होता. या दोघांविरुद्ध एनआयएने यापूर्वीच प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ते दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होते. अखेर एनआयएने मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार इंडोनेशियात त्यांचा ठावठिकाणा शोधून ही अटक केली.
या प्रकरणात यापूर्वी मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन, आणि शाहनवाज आलम या दहशतवादी संशयितांना अटक करण्यात आली आहे.
एनआयएकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आयएसआयएस मॉड्यूलमधील इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी देशभरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.