
नायगावजवळ भीषण अपघात; शिवसेना उपतालुका प्रमुखासह दोघांचा मृत्यू
प्रतिनिधी | मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव परिसरात गुरुवारी रात्री उशिरा पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत शिवसेना उपतालुका प्रमुख भागवत कोळी (वय ६२) आणि पुंडलिक रामकृष्ण कोळी (वय ५४) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भागवत कोळी आणि पुंडलिक कोळी हे दुचाकीवरून मुक्ताईनगरहून नायगावकडे जात असताना मुक्ताईनगर-खामखेडा मार्गावरील स्मशानभूमीजवळ पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅन (क्र. एमपी ०९ डीएस ६६८७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांनाही जागीच प्राण गमवावे लागले.
या प्रकरणी लखन वसंत मोरे (रा. लोहारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, संबंधित वाहनचालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा. इंदूर) याला अटक करण्यात आली आहे.
मयत भागवत कोळी हे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते. अपघाताची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईहून मुक्ताईनगर गाठून दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना भेट देत सांत्वन केले. दोघांवर नायगाव येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
भागवत कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा तर, पुंडलिक कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या अपघातामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.