
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
जळगाव : शहरातील इच्छादेवी चौक परिसरात सोमवारी (२७ मे) पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) असे मृत तरुणाचे नाव असून, अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रेम ठाकूर हा शिंदे नगर परिसरात कुटुंबासह राहत होता. तो टुर अॅन्ड ट्रॅव्हल्स व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सोमवारी पहाटे सुमारास तो शिंदे नगरातून अजिंठा चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना इच्छादेवी चौक परिसरात समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, प्रेमचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेची माहिती विठ्ठल पाटील यांनी पोलिसांना दिल्यानंतर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रेमच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.