लोकलमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा अटकेत
मुंबई ;- शनिवारी मुंबई विमानतळ उडवून देण्यासंदर्भात आलेल्या धमकी प्रकरणात सहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील बातम्या समोर आल्या असतानाच आज पुन्हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन आला. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आलेला हा फोन महिला पोलीस अधिकाऱ्याने रिसिव्ह केला. या महिला पोलीस अधिकाऱ्याने फोन करणाऱ्या व्यक्तीकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन करणाऱ्या व्यक्तीने हा फोन कट केला, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. आता हा फोन नेमका कुठून आला होता यासंदर्भातील ट्रेसिंग करण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं. पोलिसांना अवघ्या काही तासांमध्ये यश आलं. हा फोन बिहारमध्ये राहणाऱ्या अशोक शंकर मुखीया या तरुणाने केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या तरुणाला अटक केली आहे.
मुंबई पोलिसांना पहाटे आलेल्या या फोनवर आरोपी अशोक शंकर मुखीयाने आपण विलेपार्लेमधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी नेमक्या कोणत्या ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे याबद्दलची माहिती विचारली असता अशोक शंकर मुखीयाने फोन कट केला होता. आता अशोक शंकर मुखीयाने असा फोन का केला होता? हा फोन करण्यामागील मूळ उद्देश काय होता यासंदर्भातील तपास जुहू पोलीस करत आहेत.