जळगावात धुवा’धार’ पाऊस ! वाऱ्यात झाडे पडली, वीजही गेली!

जळगावात धुवा’धार’ पाऊस ! वाऱ्यात झाडे पडली, वीजही गेली!
जळगाव प्रतिनिधी : ११ रोजी रात्री आलेल्या वादळी पावसामुळे जळगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे आणि महावितरणचे इलेक्ट्रीक खांब कोसळले असून, त्यामुळे शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
काल रात्री सुमारे पावणेआठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने शहरात हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांतच अनेक भागांमध्ये झाडे, खांब कोसळल्याने दाणादाण उडाली. राष्ट्रीय महामार्गावर आयटीआयजवळ आणि पोदार शाळेजवळ मोठ्या झाडे रस्त्यावर आडवी पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती, जी रात्री उशिरा पुन्हा सुरू करण्यात आली.
वादळी पावसामुळे शहरातील अनेक भागांतील वीज खंडित झाली असून, काही ठिकाणी रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला, तरी सकाळपर्यंत अनेक भाग अंधारातच असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुमारे पाऊण तास जोरदार वादळी पाऊस झाल्यामुळे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून, नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शहरातील विविध भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख गजेंद्र पातोळे यांनी देखील मदतकार्य सुरू ठेवत पाहणी केली.