
बंगळुरू: – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) महत्त्वकांक्षी चंद्रमोहीमेविषयी महत्त्वाची बातमी आहे. चंद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून इस्रोला पहिला संदेश देखील पाठवला आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत असल्याचा संदेश चंद्रयान-3 ने पाठवला आहे. MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity, असा संदेश इस्रोला मिळाला आहे. याविषयीची इस्रोने ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान इस्रोने चंद्रयान-3 अंतराळयान 14 जुलै रोजी प्रक्षेपित केले होते. या उपग्रहाने चंद्राच्या दोन-तृतीयांश अंतर पूर्ण केले आहे.
या दिवशी उतरेल चंद्रावर: 1 ऑगस्ट रोजी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने नेण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. आता या उपग्रहाला ‘ट्रान्सलुनर ऑर्बिट’मध्ये ठेवण्यात आले आहे. इस्रोनुसार, उद्या हे उपग्रह चंद्राच्या कक्षेत सोडले जाईल. इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की, शनिवारी चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत जाणार आहे. इस्रोने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-3 ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल असेल असे म्हटले आहे.
सॉफ्ट लँडिंग अपेक्षित: चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी चंद्रयान 3 ला सुमारे 33 दिवस लागणार आहेत. चंद्राच्या पृष्ठाभागावर उतरल्यानंतर चंद्रयान-3 एक दिवस काम करणार आहे. मोहिमेचा मुख्य उद्देश हा लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरवण्याचा आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होणार आहे. इस्रोनुसार 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 मिनीटांनी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करेल, अशी अपेक्षा आहे.