अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडिया विमान कोसळले; २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडिया विमान कोसळले; २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
अहमदाबाद (प्रतिनिधी) – अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी झेपावलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी (दि. १२ जून) दुपारी अवघ्या काही क्षणांतच भीषण अपघातात कोसळले. दुपारी १.४७ वाजता उड्डाण झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत, हे विमान मेघानीनगरमधील नागरी वस्तीत कोसळले. या दुर्घटनेत एकूण २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, केवळ एक प्रवासी या भीषण अपघातातून सुदैवाने बचावला आहे.
विमानात एकूण २२९ प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. मृतांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. विशेष म्हणजे, विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विमान कोसळल्याचे ठिकाण बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वसतीगृहावर असल्याने, परिसरातील काही रहिवाशांचाही मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २६५ वर पोहोचली आहे. दुर्घटनास्थळी बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असून, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.