जळगाव: सराईत दुचाकी चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; दोन गुन्हे उघड

खान्देश टाइम्स न्यूज l ०३ जुलै २०२५ l जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पाचोरा शहरात गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. याच दरम्यान, शेख इमरान शेख रफिक (रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव, मूळ रा. अंचिकानगर, धुळे) आणि त्याचा साथीदार एक इसम मोटारसायकली चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला.
पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, संशयित आरोपी पाचोरा शहरात येणार होते. त्यानुसार, पोलिसांनी पाचोरा येथे सापळा रचून शेख इमरान शेख रफिक (वय २४) आणि त्याचा साथीदार शेख अकिल शेख शफिक (वय २७, रा. जलाली मोहल्ला, भडगाव) यांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी भडगाव शहरातून दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांनी विजय हॉटेलसमोरून एक हिरो कंपनीची दुचाकी आणि खोल गल्लीतील सलून दुकानासमोरून एक बजाज कंपनीची दुचाकी चोरल्याचे सांगितले. या दोन्ही चोरीप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
याव्यतिरिक्त, आरोपी शेख इमरान शेख रफिक याच्याकडून एक मोपेड दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. शेख इमरान हा एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी धुळे जिल्ह्यात घरफोडी, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार शेख अकिल याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील आणि भूषण पाटील यांचा समावेश होता. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
