
अवजड वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी ठार
एक गंभीर जखमी ; ममुराबाद रस्त्यावरील घटना
जळगाव प्रतिनिधी
शहरातील मास्टर कॉलनीत राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा भरधाव डंपरणे चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. हा दुर्दैवी अपघात शनिवारी, १ मार्च रोजी सकाळी १० वाजता ममुराबाद रस्त्यावर घडला. फैसल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र वासीक खान युसुफ खान (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे.
फैसल आणि वासीक हे दोघे दुचाकीने जळगावहून महाविद्यालयाकडे जात होते. ममुराबाद रस्त्यावर समोरून येणाऱ्या विटांनी भरलेल्या मालवाहू वाहन (क्रमांक एमएच १३ एएन ४४४५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला, तर वासीक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच फैसलचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. फैसल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात हळहळदायक वातावरण निर्माण झाले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे.