लक्ष्मी नगर येथे 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास ! पंढरपूर वरून पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतलेल्या आईला धक्का !

लक्ष्मी नगर येथे 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरी घेतला गळफास ! पंढरपूर वरून पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतलेल्या आईला धक्का !
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील कानळदा रोडवरील लक्ष्मी नगर येथे २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (८ जुलै) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना त्याची आई पंढरपूरहून पांडुरंगाच्या दर्शनावरून परतल्यानंतर उघड झाली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव सचिन उर्फ रामेश्वर लक्ष्मण भोई (वय २५, रा. लक्ष्मी नगर, कानळदा रोड, जळगाव) असे आहे. सचिन भोई हा केळकर मार्केटमधील एका कपड्यांच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, तो आईसह राहत होता.
आषाढी एकादशीनिमित्त सचिनची आई मंगलाबाई या पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दरम्यान, सचिन घरी एकटाच होता. मंगळवारी सकाळी मंगलाबाई घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच घरात सचिनने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही दृश्य पाहून त्यांनी जोरात आक्रोश केला. त्यांच्या हंबरड्याने शेजारी आणि परिसरातील नागरिक धाव घेतले.
त्यानंतर सचिनला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने लक्ष्मी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबीयांसह मित्रांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
