जळगाव जिल्ह्यात सोमवारी सर्व मद्यदुकानं बंद; वाढलेल्या करवाढीविरोधात मूक मोर्चा

जळगाव जिल्ह्यात सोमवारी सर्व मद्यदुकानं बंद; वाढलेल्या करवाढीविरोधात मूक मोर्चा
प्रतिनिधी, जळगाव :
राज्य सरकारने मद्यावर लावलेल्या करामध्ये २५ टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रेते आणि बारचालकांनी सोमवारी, १४ जुलै रोजी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात जळगाव जिल्हा परमिट रूम व वाईन असोसिएशनच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे २० हजारांहून अधिक बार असून त्यातून राज्य शासनाला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या उद्योगातून सुमारे सहा लाख लोकांना थेट रोजगार, तर पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो.
मात्र यावर्षी सरकारकडून आधीच १५ टक्के परवाना शुल्कात वाढ करण्यात आली असून त्यात आता मद्यावरील करात एकूण ६० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मद्यविक्रीत सुमारे २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
करवाढीमुळे राज्यातील अनेक बार बंद पडल्याचेही सांगण्यात आले. परिणामी अनेकजण बेरोजगार झाले असून अवैध मद्यविक्री आणि बाहेरून येणाऱ्या दारूचा प्रश्नही वाढला आहे. सरकारने व्हॅट करवाढीचा फेरविचार करावा, तोपर्यंत तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवार, १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील बार आणि मद्य दुकाने बंद ठेवण्यात येणार असून शांततेत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
